यंत्रमागाचे वीजदर स्थिर ठेवण्याची घोषणा हवेत

इचलकरंजी,  शहरातील यंत्रमागधारकांना महावितरण कंपनीने दिवाळीपूर्वीच दरवाढीचा शॉक दिला आहे. यंत्रमागधारकांच्या वीज बिलात प्रति युनिट एक रुपये वाढ करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे यंत्रमागाचे वीजदर पाच वर्ष स्थिर ठेवणार ही घोषणा हवेत विरली आहे. दरवाढ अशीच राहिली तर वस्त्रोद्योग नामशेष होईल अशी भिती व्यक्त होत आहे.

 शहरातील यंत्रमाग उद्योग आता सुरळीत सुरू झाला होता. तोपर्यंत पुन्हा एकदा वीज वितरण कंपनीने यंत्रमाग उद्योगावर वीज दरवाढ करून संकट उभे केले आहे. नुकतेच यंत्रमागधारकांच्या  हातात विजेची बिले पडली. त्या बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याचे निदर्शनास आले. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर विजेच्या दरात कपात करावी. अशी मागणी य ंत्रमाग धारकातून होत होती. त्याला प्रतिसाद देत प्रति युनिट एक रुपये वीज दरामध्ये कपात करण्यात आली. मात्र एक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच पुन्हा एकदा विजेच्या दरात वाढ करण्यात आली. २७ अश्वशक्ती वरील यंत्रमाग धारकांच्या वीज बिलात  प्रति युनिट ६० ते ७० पैसे तसेच २७ अश्व शक्ती खालील वीज बिलामध्ये ४० पैसे ते ५० पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे. याचा मोठा फटका यंत्रमाग उद्योगाला बसला आहे. २४ यंत्रमाग असलेल्या अत्याधुनिक (ॲटोलूम) कारखान्याच्या वीज बिलामध्ये सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची वाढ झाली आहे. तर साध्या कारखान्यात अडीच ते तीन हजार रुपये वाढ झाली आहे. दिवाळी जवळ आली आहे या काळामध्ये कामगारांना बोनस देण्यासाठी मालक धडपड करत असतो. त्या पद्धतीने रक्कम गोळा करण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र दिवाळी पूर्वीच अचानक वाढलेल्या वीज दरामुळे कारखानदार अडचणीत सापडणार आहे.