विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

विधानसभा निवडणूक जस-जशी जवळ येत आहेत तस तसे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. शहरातील काही राजकीय नेते मंडळी हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी शिवसेनेच्या माध्यमातून इचलकरंजी विधानसभेची जागा कशी मिळेल यासाठी शहरातील एका दादाबरोबरच काही राजकीय पक्षाच्या नेत्यानी उमेदवारी आणण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. ताराराणी पक्षाच्या वतीने राहुल आवाडे यांची उमेदवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर केली आहे.

प्रसंगी महायुतीतून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक आहेत. जर महायुती मधून उमेदवारी मिळाली नाही तर ते ताराराणी पक्षातून निवडणूक लढवणार आहेत. आवाडे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. आपापल्या पक्षातून चाचपणी केली जात असून इच्छुकांची माहिती ही घेतली जात आहे. त्यातच आमदारकी लढविण्यासाठी शहरांमध्ये इच्छुक असलेल्या नेत्यांची चार दिवसापूर्वी बैठक झाली. या बैठकीमध्ये एका नावावर एकमत झाल्याचे बोलले जात आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीत एकास एक तुल्यबळ उमेदवार द्यायचा असा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला असल्याचे समजते. नगरपालिका निवडणुकीपासून आघाडी म्हणून शहरामध्ये एक वेगळे जाळे निर्माण केलेले काही नेते यासाठी आघाडीवर आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देऊन त्यांच्या मागे फरपटत न जाता आपणच आपल्यातील तुल्यबळ उमेदवार उभा करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. दादा म्हणून परिचय असलेले आणि एका समाजासाठी लढलेले एक नेते आणि आघाडीचे प्रमुख यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेची उमेदवारी इचलकरंजीत आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे समजते. त्यासाठी दादांनी पुढाकार घेतला असून ते गेली चार दिवस उद्धव ठाकरे बरोबरच विविध नेत्यांची संपर्क साधत आहेत. जर त्यांना यश आले तर आवाडेच्या विरोधात भक्कम पर्याय दिला जाऊ शकतो. या घडामोडीमुळे शहरातील राजकीय वातावरण अधिक ढवळून निघाले आहे.

सुरेश हाळवणकर यांनीही पहिल्यापासून तयारी सुरू केली आहे. पक्षात असलेल्यांना उमेदवारी दिली जाते असे त्यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. ते स्वतः प्रदेश उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या शब्दाला पक्षामध्ये किंमत आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला ही महत्त्व आहे. आगामी काळामध्ये अनेक घडामोडी घडणार आहेत. कोणता नेता कोणत्या पक्षात जातो हे पाहणे उचित ठरणार आहे. त्यावरच विधानसभेची उमेदवारी अवलंबून असणार आहे.