इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठ्याबाबत काही ना काही समस्या सतत होत राहतात. काही वेळा नदी प्रदूषण तसेच सतत होणारी गळती यामुळे नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. एका लागलेल्या गळतीचे काम पूर्ण होते न तोच पुन्हा दुसऱ्या ठिकाणी गळती लागते. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याचा पुरता बट्ट्याबोळ उडताना दिसत आहे. पंचगंगा पाणी उपसा योजना ही कालबाह्य झाली आहे. तरीही याचा सध्या वापर केला जात असला तरी प्रदुषणामुळे आणि पाणी पातळी सतत कमी होत असल्याने येथूनही करण्यात येणारा उपसा बऱ्याचवेळा बंद केला जातो. त्यामुळे शहराला कधीच वेळेवर पुरेसा पाणी पुरवठा होत नाही.
कृष्णा नळपाणी योजनेच्या वितरण नलिकेला मजरेवाडी येथे गळती लागल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडीत होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. सदर पाइपलाईनची गळती काढणेचे काम पुर्ण होताच शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करणेत येईल. तरी नागरिकांनी आपल्या जवळचा उपलब्ध पाणी साठा जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.
दोन योजना असूनही सध्या या योजना कामाच्या नसल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे शहराला पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाणी योजना राबविणे क्रमप्राप्त बनले आहे. स्थानिक नेत्यांमध्ये असलेला एकजुटीचा अभाव पहाता नवी योजना होणार का? असा सवाल आजही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
