हातकणंगले तालुक्यातील कासारवाडीत बिबट्याचा वावर!

कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील वाघजाईचे माळ परिसर व सादळे (ता. करवीर) येथील सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मागील आठवड्यात कासारवाडी येथील ‘वाघजाईचे माळ’ परिसरातील शेतातून बिबट्याने मेंढपाळाचे कुत्रे पळवले होते.

त्यामुळे वनविभागाने या परिसरातील शेत शिवारात बिबट्याचा शोध घेतला होता. यानंतर मंदिर परिसरातील काही भटक्या कुत्र्यांचा फडशा पाडल्याचे दिसून आले आहे. वाघजाई मंदिराच्या समोरील उदय निकम यांच्या शेतात वारंवार बिबट्याच्या पायाच्या खुणा आढळून आल्या आहेत.

नुकतेच कासारवाडी गावच्या उत्तरेस पश्चिमेस व सादळे (ता. करवीर) येथील सिद्धेश्वर मंदिराच्या पूर्वेकडे कासारवाडी येथील पोवारांच्या शेतात दिवसा खुरपणी करण्यासाठी गेलेल्या शेतकरी व महिलांना बिबट्याचे भर दुपारी दर्शन झाले. यामुळे या परिसरातील शेतकरी आता शेतात जाण्यास घाबरत आहेत.