मुंबई, ठाणे, पालघर मतदारसंघातील निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. लोकसभेच्या निकालावरच आगामी मुंबई महापालिकेचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष ताकदीने मैदानात उतरले आहेत. उमेदवार निश्चितीपासून डाव-प्रतिडावाचे राजकारण रंगले आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर स्थानिक नेत्यांचे विभाजन झाले, पण मतदारांचे काय? याचा अंदाज दोन्ही नेत्यांना नसल्याने कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्यास तयार नाहीत.मुंबईसह व ठाणे, कल्याण मतदारसंघात शिंदेसेना व उद्धवसेनेची प्रतिष्ठा पणास लागल्याने तिथे जोडण्या लावण्यासाठी पक्षातील विश्वासू शिलेदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे.उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे तर शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गेली पाच दिवस तळ ठाेकला आहे.
