वाळवा तालुका धनदांडग्यांचा मानला जातो. त्यामुळेच शेती, भूखंड, खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सहायक दुय्यम निबंधक यांच्यापुढे होतात. परंतू येथे काही व्यवहार चार आण्याचा असला तरी कार्यालयात मसाल्यासाठी बारा आणे खर्च करावे लागतात. कागदपत्रावेळी पॅनकार्ड नसेल तर दस्त होणार नाही, अशी भाषा अधिकारी वापरतात. पर्यायी व्यवस्था असतानाही अडवणूक केली जाते. रजिस्टर साठेखत, खरेदीपत्र, बक्षीसपत्र, गहाणखत सारखे दस्त झाल्यानंतर त्याचा उतारा ३ ते ४ दिवसांनी पक्षकारांना दिला जातो.
वास्तविक दस्तासोबतच उतारा देण्याचा नियम असतानाही हेलपाटे घालण्यास भाग पाडले जाते. सामान्य नागरिकांना कर्जासाठी तारण म्हणून मालमत्ता द्यावी लागते. त्याचा उतारा देताना अडवणूक होते. वयस्कर ज्येष्ठ नागरिक, महिलांना दस्तऐवजावेळी कार्यालयात ताटकळत बसवण्यात येते. फायलीचे वजन जास्त त्याला अग्रहक्काने मंजुरी
दिली जाते. दस्तऐवज नोंदणीचे काम वेळेत सुरू होत नाही. कार्यालयात चिरीमिरीचा फंडा कित्येक वर्षे सुरू आहे.