वारणा बँकेच्या अध्यक्षपदी निपुण कोरे उपाध्यक्षपदी उत्तम पाटील यांची फेरनिवड

वारणा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निपुण विलासराव कोरे (वारणानगर) यांची तर उपाध्यक्षपदी उत्तम बाबासो पाटील (लाटवडे) यांची बिनविरोध फेरनिवड झाली. सहकारातील बँकींग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या वारणा सहकारी बँकेची सन २०२३ ते २०२८ सलासाठीची पंचवार्षिक निवडणूक वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली व विद्यमान अध्यक्ष निपुण कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच सलग चौथ्यांदा बिनविरोध झाली.

आज बँकेच्या सभागृहात पन्हाळ्याचे सहकारी संस्था सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी नारायण परजणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत निपुण कोरे यांची तर उपाध्यक्षपदी उत्तम पाटील यांची बिनविरोध फेरनिवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना अध्यक्ष कोरे म्हणाले, वारणा बँकेची पंचवार्षिक निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध करून सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे.

या विश्वासाच्या जोरावरच बँकेने नेत्रदीपक प्रगती साधली आहे. बँकेच्या महाराष्ट्रात अद्ययावत ४० शाखा कार्यरत आहेत. आर्थिक वर्षात वार्षिक १५०० कोटी रुपयांची उलाढाल केली असून सध्या ९२२ कोटी रुपयांच्या ठेवी असून लवकरच एक हजार कोटी रूपये ‘ठेवींचा टप्पा बँक पूर्ण करेल. ‘ यावेळी ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे, महादेव चावरे, अरविंद बुद्रुक, बाबासाहेब बावडे, बळवंत पाटील, प्रताप पाटील, विनायक बांदल, अभिजीत पाटील, प्रकाश माने, प्रभाकर कुरणे, संजय जमदाडे, प्रशांत जमने, नानासाहेब दुर्गाडे, सुवर्णा माने, महानंदा घुगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.