इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पवार गटाने फुंकले विधानसभेचे रणशिंग!

आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही वेळेस लागू शकते. तसेच निवडणुका देखील जाहीर होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात उमेदवारीवरून चर्चांना उधाण आलेले आहे. अनेक नेते मंडळींनी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलेले आहे. अशातच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस गटाने आगामी विधानसभा निवडणुकीचे दसऱ्याच्या मुहूर्तावर रणशिंग फुंकलेले आहे.

संभाव्य उमेदवार मदन कारंडे यांनी येथील श्रीराम सेवाभावी ट्रस्टच्या वतीने दसरा महोत्सवाचे आयोजन केलेले होते. या कार्यक्रमांमध्ये आमदार रोहित पवार देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी करण्यात आलेली होती. आतिषबाजी पाहण्यासाठी इचलकरंजी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मदन कारंडे यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेलेला होता. मान्यवरांच्या हस्ते रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून सोनं लूटण्याचा कार्यक्रम पार पडला. ताशांचा कडकडाट तुतारीचा आवाज आणि राम कृष्ण हरी आता वाजवा तुतारी या घोषणामुळे वातावरणामध्ये एकच उत्साह दिसून आलेला होता.