पुतळा समितीवरून ईश्वरपूर पालिका सभेत खडाजंगी

ईश्वरपूर शहरात उभारण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी समिती स्थापन करण्यावरून नगरपालिकेच्या सभेत सत्ताधारी व विरोधकांच्या जोरदार खडाजंगी झाली.

आधी पुतळा समिती स्थापन करा, मगच पुतळ्यासाठी जागा निश्चिती करा, असा आग्रह विरोधकांनी धरला. जागा व खर्च नगरपालिकेचा असताना तालुक्यातील समिती स्थापन होऊ देणार नाही. यामध्ये राजकारण येऊ देणार नाही. सर्व समावेशक व नगराध्यक्षांच्या अध्यक्षखाली शहरातीलच पुतळा समिती स्थापन करा, असा आग्रह विरोधी पक्ष नेते आनंदराव पवार यांनी लावून धरला.

नगराध्यक्ष आनंदराव मुलगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत नगरपालिकेची सभा पार पडली. या सभेत शहरात नमो उद्यान विकसित करणे, शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांना मुदतवाढ देणे, नवीन पाण्याचे टँकर खरेदी करणे, फिरती शौचालये दुरुस्त करणे, नगरपालिकेच्या मालमत्तांचे अभिलेख जतन करणे व मालमत्ता दप्तर तयार करणे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबवणे, अंबिका उद्यान परिसरातील गाळ्यांचा लिलाव काढणे, शेतकरी उद्यानाची दुरुस्ती करणे तसेच वाहन पार्किंगची व्यवस्था करणे, आदी ठराव मंजूर करण्यात आले.

शहरात नगरपालिकेच्या हद्दीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. हा ठराव मंजूर करत असताना आधी पुतळा समिती स्थापन करा, मगच विषय मंजूर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते आनंदराव पवार यांनी केली. यावर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी हा विषय जागा निश्चितीचा आहे. समितीचा यात संबंध येत नाही. शनी मंदिर परिसरातील दोन गुंठे जागा पुतळ्यासाठी निश्चित केल्याचे सांगितले. त्यावर पवार यांनी पुतळा शहरात उभा राहतोय, त्यामुळे तुमच्या अध्यक्षतेखाली व सर्व पक्षाच्या नगरसेवकांना घेऊन आधी फक्त शहरातील समिती स्थापन करा. आमचा पुतळ्याला विरोध नाही, मात्र तुम्हीही राजकारण आणू नका. आम्ही तालुक्यातील समिती स्थापन होऊ देणार नाही, असे सांगितले. यावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.

विरोधी नगरसेवक अमित ओसवाल, राजवर्धन पाटील, अजित पाटील, अनिता ओसवाल, सतेज पाटील यांनी आधी समिती स्थापन करा, मगच जागा निश्चितीचा ठराव करा, अशी मागणी लावून धरली. सत्ताधारी पक्षाकडून सुभाष सूर्यवंशी, अरुणादेवी पाटील, संग्रामसिंह पाटील, शुभांगी शेळके, रेखा कोळेकर, डॉ. संग्राम पाटील, सुनील मलगुंडे यांनी ‌’तुम्हाला पुतळा महत्वाचा की समिती महत्त्वाची, तुमच्या सत्ता काळात पुतळा का उभा केला नाही?‌’ असे प्रश्न उपस्थित केले. हा वाद वाढत असताना मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. शेवटी हा ठराव सत्ताधाऱ्यांनी बहुमताने मंजूर केला.

नगरपालिकेच्या मालिकेचे क्लब हाऊस भाडेतत्त्वावर देण्याला तसेच शेतकरी उद्यानाच्या दुरुस्तीलाही विरोधी नगरसेवकांनी विरोध केला. क्लब हाऊस भाड्याने देण्यापेक्षा येथे बॅडमिंटन खेळाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना मांडली. तसेच शेतकरी उद्यान हे खासगी जागेत आहे. त्यावर नगरपालिकेला निधी खर्च करता येतो का? असा सवाल आनंदराव पवार, अमित ओसवाल, राजवर्धन पाटील, अजित पाटील यांनी उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी पाटील यांनी उद्यानाची फक्त दुरुस्ती करायची आहे, असे सांगितले.