हातकणंगले तालुक्यातील यळगूडमध्ये एकाचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट

हातकणंगले तालुक्यातील यळगूड येथील जवाहर साखर कारखाना पेट्रोलपंपासमोरील टायर पंक्चर दुकानदार गिरीष पिल्लाई (वय ५०, सध्या रा. विशालनगर, हुपरी) यांचा अज्ञातांनी गुरुवारी रात्री त्याच्या दुकानातच खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.पोटात चाकूचे वार करून व डोक्यात लोखंडी टॉमीने वर्मी घाव घालून खून करण्यात आला आहे.

या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवी यांच्यासह पोलिस अधिकारी हे घटनास्थळांवरील माहिती घेऊन हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते.याबाबत पोलिस व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, गिरीष पिल्लाई यांचे पेट्रोलपंपासमोरच टायर पंक्चर काढण्याचे दुकान आहे.

गेल्या २५ वर्षांपासून त्यांचा येथे व्यवसाय आहे. रात्री दुकान बंद करून ते दुकानातच झोपले होते. त्यांच्या केरळमधील मूळ गावी वास्तव्यास असणारी त्यांची पत्नी रात्री साडेदहा वाजल्यापासून त्यांना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होती. दहा-पंधरा वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न करून देखील संपर्क होत नव्हता.

त्यामुळे तिला काळजी वाटल्याने त्यांचा मित्र व कारखान्याचा कर्मचारी बबलू चव्हाण याला भ्रमणध्वनी करून गिरीष फोन का घेत नाही? याबाबत दुकानाकडे जाऊन चौकशी करण्यास सांगितले. बबलूने दुकानात जाऊन पाहिले असता दुकानाचे शटर बंद होते.

शटर वर करून पाहिले असता गिरीष हा शटर जवळच रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्याने ही माहिती हुपरी पोलिसांना दिली.