सराईत गुन्हेगारांकडून 6 लाखांचा गुटखा जप्त! सांगोल्यातील दोघांना अटक

आटपाडी तालुक्यात गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सहा लाखांच्या गुटख्यासह 11 लाख 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.नवाज बादशाह मुलाणी (वय 25, रा. एकतपूर रस्ता, बनकर वस्ती, सांगोला, जि. सोलापूर) आणि जुबेर जमीर मुलाणी (22, रा. एकतपूर रस्ता, पुजारवाडी, सांगोला) अशी संशयितांची नावे आहेत.

ही कारवाई दिघंची-आटपाडी रस्त्यावरील कारखाना फाटा परिसरात करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने विशेष पथक स्थापन करून, गुटख्याची विक्री, वाहतूक आणि साठा करणार्‍यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पथकाला दिघंची ते आटपाडी रस्त्यावरील कारखाना फाटा येथे एका पांढर्‍या मोटारीतून (एमएच 45 एएफ 4502) गुटख्याची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. काही वेळात नवाज व जुबेर हे मोटारीतून येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. चालकाने मोटार थांबविल्यावर पोलिसांनी तपासणी केली असता, मोटारीत प्रतिबंधित सुगंधी सुपारी, तंबाखू, पानमसाला, गुटखा असा पाच लाख 70 हजारांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी गुटखा, चारचाकी वाहन असा 11 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व संशयितांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस चौकशीत जप्त केलेला मुद्देमाल सांगोला येथील अभिजित मस्के याच्याकडून आणल्याची माहिती संशयितांनी दिली. दोन्ही संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगोला पोलिस ठाण्यात यापूर्वी गुटखा वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत. कारवाईत पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, सूरज थोरात, सुशांत चिले आदींनी सहभाग घेतला.