मराठा समाजाचं वाटोळं मराठा नेत्यांनीच केलं, २४ डिसेंबरनंतर नावं जाहीर करणार

आमच्या मराठा समाजाचं जास्त वाटोळं मराठा नेत्यांनीच केलं, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. आमच्या जीवावर निवडून आले, केंद्रात तसेच राज्यात मंत्री झाले. मुख्यमंत्रीपदही घेतलं. पण त्यांनी आम्हाला साथ दिली नाही, म्हणून आमचं वाटोळं झालं. आमच्या हक्काचं आरक्षण त्यांनीच घालवलं. ३०-४० वर्षापासून सरकारवर ओबीसी नेत्यांचा दबाव होता म्हणून पुरावे लपलेले होते, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. 

इतकंच नाही, तर २४ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर सर्वांचीच नावे जाहीर करणार, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. कोण कोण ओबीसींमध्ये २० वर्षांपासून आहे. आपलं आरक्षण कुणी घालवलं, त्यांची नावं देखील सर्वांसमोर मांडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.

३०-४० वर्षापासून सरकारवर ओबीसी नेत्यांचा दबाव होता, म्हणून पुरावे लपलेले होते. असंही जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज जालन्यात पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेतून त्यांनी मराठा नेते तसेच ओबीसी नेत्यांवर शाब्दिक हल्ला चढवला. ओबीसींनी आरक्षणात ज्या सवलती आहेत. तसंच त्यांना जे मिळत आहे, तेच आम्हालाही मिळालं हवं, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालं पाहिजे असं थेटच जरांगे यांनी म्हटले आहे. मात्र, ओबीसी नेत्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका जाहीर करावी की, त्यांचा नेमका विरोध कशाला आहे. आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी असल्याने ओबीसीचे सर्व हक्क आम्हाला मिळणारच आहे, असं जरांगे म्हणाले.

आत्तापर्यंत ४० वर्षे मराठा बांधवांचं नुकसान झालं आहे. आता ओबीसी लोकांना हे कळलं आहे. ओबीसी नेत्यांचं ते ऐकणार नाहीत अशी आम्हाला खात्री आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आमचंच आरक्षण आम्हाला दिलं जातं आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सरकारचं म्हणणं योग्यच आहे असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.