खानापूर मतदारसंघातील महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर ! विधानसभा निवडणूकीमध्ये पुन्हा महायुतीमध्ये रंगणार राजकारण!

सद्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षनेत्यांच्या बैठका आणि दौरे वाढले आहेत. दिवाळीनंतर निवडणूक लागण्याची शक्यता असताना महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे.दरम्यान, जागावाटपावरुन महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणूकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये देखील जागावाटप हे महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. कारण महायुतीच्या अंतिम जागावाटपापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीने आपापला जागावाटप फॉर्मुला अद्याप जाहीर केलेला नाही. चर्चा सुरु असल्यामुळे कोणाला नक्की किती अन् कोणत्या जागा मिळणार हे स्पष्ट झालेले नाही. तरी देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवाराचे थेट नाव जाहीर करुन टाकले आहे.

श्रीकांत शिंदे यांनी सांगलीतल्या खानापूर (विटा) मतदारसंघातील आटपाडीमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती. सुहास बाबर आयोजित दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने श्रीकांत शिंदेंनी उपस्थिती लावली. त्यांनी उपस्थितांशी संवाद देखील साधला.

यावेळी सुहास बाबर यांच्या पाठिशी आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायचं आहे, असे विधान श्रीकांत शिंदे यांनी केले. त्यामुळे महायुतीकडून खानापूर (विटा) मतदारसंघातील महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर झाल्याची चर्चा रंगली आहे.