पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारीने भारताला गोळाफेकीत रौप्यपदक जिंकून दिले. सचिनने Men’s Shot Put – F46 Final १६.३२ मीटर ( दुसऱ्या प्रयत्नात) या कामगिरीसह रौप्यपदक जिंकले.या पदकानंतर सांगली जिल्ह्यातील आटपाडीत दणक्यात जल्लोष केला गेला.
पदक जिंकल्यानंतर सचिनच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याने आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीचं फळ व्यक्त करणारा होता. लहानपणापासूनच काटेरी वाट तुडवत त्याने आटपाडी ते पॅरिस असा केलेला प्रवास हा खऱ्या अर्थाने सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. करगणीचे कृषीभूषण शेतकरी अँड. सर्जेराव खिलारी यांचा तो मुलगा.
सचिन सहा वर्षांचा असताना एका मोठ्या अपघाताला त्याला सामोरे जावे लागले. घरातील लग्नकार्याच्या खरेदीसाठी खिलारी कुटूंब बाहेर गेले होते आणि तिथून परत येत असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यात सचिनच्या आईचा मृत्यू झाला. वडिलांनीच त्याचे संगोपन केले.लहानपणी खेळताना सायकलवरून पडून त्याच्या एका हाताला गंभीर दुखापत झाली. यात हाताला दिव्यांगत्व आले.
त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण करगणीत, उच्च माध्यमिक आटपाडीत आणि अभियांत्रिकचे शिक्षण बारामतीत पूर्ण केले. सचिनचे वडील आणि कुटुंबीय पूर्णपणे शेती करत आणि शेतीवरच उदरनिर्वाह चालतो.सचिनची उंची आणि सडपातळ शरीर यामुळे तो खेळाकडे वळला आणि त्याने भालाफेकीला सुरुवात केली.
सुरुवातीला तो खुल्या गटातून खेळत होता, परंतु बंगळुरू येथे झालेल्या भालाफेक स्पर्धेदरम्यान प्रशिक्षकांनी त्याला पॅरा खेळाडू म्हणून खेळण्याचा सल्ला दिला. त्यांनी सचिनला गोळाफेक क्रीडा प्रकार निवडण्यास सांगितले.
त्यानंतर सचिनने आपला मोर्चा गोळा फेकीकडे वळवला.अत्यंत मेहनतीने त्याने गोळाफेकीसाठी वजन ७२ किलो वरून ११० किलो केले. गेल्याच वर्षी त्याचे वडील सर्जेराव खिलारी यांचे निधन झाले. पण, तो खचला नाही आणि अलीकडे झालेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले.
आज त्याने पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आणि याचा आनंद म्हणून त्याच्या गावात घरी चुलता, चुलती, भाऊ, वहिनी आणि वराडखडीवरील लोकांनी जणू दिवाळीच साजरी केली. गावात आणि तालुक्यातील मोठा आनंद उत्सव साजरा केला. यावेळी सर्जेराव यांची उणीव कुटुंबियांना जाणवली.