आ.जयंतरावांना मतदारसंघात रोखणार कोण? रंगू लागल्या राज्यस्तरावर चर्चा!

सध्या सर्वत्र गणेशोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण आहे. अशातच अनेक राजकीय पक्षांकडून आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी देखील सुरू झालेली आहे. इस्लामपूर मतदारसंघाचे काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील आगामी विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करून सलग आठव्यांदा आमदार होण्याच्या तयारीला लागलेले आहेत. त्यांनी प्रत्येक निवडणुकीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करत विजयी झालेले आहेत.

आमदार जयंत पाटील यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभर जावे लागणार आहे. मतदार संघात मला अडविण्याचा प्रयत्न होईल असे वक्तव्य करत त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सावध व दक्ष राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी राज्यपातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.

त्यांना मतदारसंघात रोखण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून फिल्डिंग लावल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार यापेक्षा कोणता उमेदवार आमदार जयंत पाटील यांना रोखू शकतो यावर राज्यस्तरावर चर्चा रंगू लागलेल्या आहेत.