आटपाडीसह जिल्ह्यातील अनेक सराफांकडील तब्बल 3.5 किलो सोने घेऊन पलायन केलेल्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले आहे. मात्र या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मात्र अद्याप फरार आहे.अटक करण्यात आलेल्यामध्ये सर्व गोपाल दास (वय 38) आणि बिश्वनाथ गोपाल दास (40, दोघे रा.कोला घाट, पूर्व मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) अशी त्यांची नावे आहेत.आटपाडीमध्ये गौतम दास हा सराफांकडून चोख सोने घेऊन त्याचे दागिने बनवून देण्याचे काम करीत होता.
गौतम दास याने आटपाडीसह जिल्ह्यातील अनेक सराफांकडून तब्बल 3.5 किलो चोक सोने घेऊन पलायन केल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने गुन्हेगारांच्या मागावर पथके रवाना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करण्यात आली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे व उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या नेतृत्वात या पथकांकडून सोने घेऊन पलायन केलेल्यांचा शोध सुरू होता.
तपास सुरू असताना या गुन्ह्यातील काहीजण पश्चिम बंगालमध्ये गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने पश्चिम बंगालमधील कोला घाट येथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. दोघांना पश्चिम बंगालमधील तमलुक न्यायालयात हजर करून दोघांना तेथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोन्ही संशयतांना आटपाडी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालया समोर दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांकडे कसून तपास सुरू आहे.
या गुन्ह्यातील मुख्य संशयित गौतम दास याच्यासह अन्य काही साथीदार अद्याप फरार आहेत. त्यांच्यादेखील मागावर पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांना ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.