शिवशाही बसने घेतला पेट! मोठी हानी टळली

स्वारगेटवरून सांगलीकडे निघालेल्या शिवशाही बसला पुणे-बेंगलोर महामार्गावर साताराजवळील वाढे फाटा येथे आग लागली. पाठीमागील टायर फुटल्याने बसने पेट घेतला; पण प्रसंगावधान राखत चालक, वाहक व प्रवासी गाडीमधून बाहेर पडल्याने मोठी हानी टळली.या आगीत बस जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.

चालक दादासाहेब कोळेकर व वाहक कबीर शेख हे सांगली आगाराची शिवशाही बस (क्रमांक एम. एच. 06 बीडब्ल्यू 3722) घेऊन स्वारगेट बस स्थानकावरून सांगलीला जात होते. या बसमधून 30 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

बस दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पुणे -बेंगलोर महामार्गावरील वाढेफाटा येथे आली असता बसचा वाहकाच्या बाजूकडील पाठीमागील टायर फुटला. त्यानंतर बसने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत त्वरित बस चालक व वाहकाने बसमधील प्रवाशांना बाहेर काढले.

बस पेटल्यामुळे धुराचे लोटच्या लोट वाहत होते. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ वाहतूक पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरील वाहतूक बंद केल्याने वाहनांच्या दोन्ही बाजूला लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

जोरदार वार्‍यामुळे आग पसरत होती. सातारा नगरपालिकेसह अन्य अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यात यश आहे. परंतु या आगीत बससह प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू, बॅग व साहित्य जळून खाक झाले.

घटनास्थळी महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड, यंत्र अभियंता विकास माने, सुरक्षा व दक्षता अधिकारी शेखर फरांदे यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी भेट देवून पाहणी केली. तसेच अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना अन्य बसमधून पुढील प्रवासासाठी बसवून देण्यात आले.