खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर धर्मसंकट…

सध्या आगामी विधानसभा निवडणुका लढविण्यासाठी इच्छुकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन, सभा, मेळावे यातून मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. इचलकरंजीतून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी रवींद्र माने, हातकणंगलेतून अविनाश बनगे यांनी जोरदार तयारी सुरू केलेली पाहायला मिळत आहे. त्यांनी गावागावात संपर्क अभियान राबवून वातावरण तयार करत आहेत. मात्र हातकणंगले तालुक्यातील एकच मतदारसंघ हा शिवसेनेला मिळणार आहे. हे अगदी स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे कोणाला थांबवायचे असा प्रश्न सध्या खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर उभा आहे.

इचलकरंजी मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा दावा जिल्हा शिवसेनाप्रमुख रवींद्र माने यांनी केलेला आहे आणि ते मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी थेट प्रती मुख्यमंत्री डॉ. श्रीकांत शिंदे अग्रही आहेत. इचलकरंजीची जागा शिवसेनेला सोडा एक हक्काचा आमदार देतो असा विश्वास डॉ. शिंदे यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्याचे समजते आहे.

मागील आठवड्यात रवींद्र माने यांच्यासाठी डॉ. शिंदे यांनी कार्यकर्त्यांची इचलकरंजीत बैठक घेऊन तयारीला लागा अशा सूचनाही केल्या. दरम्यान हातकणंगले येथील संपर्क कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी खासदार माने यांनी हातकणंगले विधानसभेला लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष अविनाश बनगे उमेदवार असतील असे संकेत दिले. त्यामुळे आता खासदार धैर्यशील माने नेमकी कुणाची पाठराखण करतात हे आगामी काळात पहावे लागेल.