कागल-सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण रस्त्याबाबतच्या स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आम. राजूबाबा आवळे व राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिरोली-नागाव फाटा, टोप, संभापूर मेनन रिंग- मंगराचीवाडी फाटा, अंबप फाटा, वाठार, किणी या ठिकाणांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली, आणि स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्या सोडवण्याच्या सूचना केल्या.
यावेळी शिरोली येथे बॉक्सऐवजी पिलरचा पूल, पीर बालेचाँद दर्गा येथे ऊस वाहतुकीसाठी मोठा भुयारी मार्ग, शिवाजीनगर येथे विद्यार्थ्यांसाठी भुयारी मार्ग, शिरोली एमआयडीसी पर्यंत दोन्ही बाजूला मर्जिंग पॉईंट, टोप- कासारवाडी फाटा व बिरोबा मंदिर या ठिकाणी पाईपलाईनसाठीव्यवस्था करणे आदींबाबत स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. आम. आवळे यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी माजी सरपंच शशिकांत खवरे, टोपचे माजी उपसरपंच विजय पाटील, महेश चव्हाण, उत्तम सावंत, संभापूरचे माजी सरपंच प्रकाश झिरंगे, अॅड. राजवर्धन पाटील, बाजीराव सातपुते, अमोल सिसाळ यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.