आष्टा येथील डॉ. अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकीचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्व गुणांचे सध्याच्या नेत्यांनी अनुकरण करायला हवे असे मत आ. सत्यजीत देशमुख यांनी व्यक्त केले. ते संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन स्नेह- २०२५ कार्यक्रमाच्या उद्घाटनात बोलत होते. आ. देशमुख म्हणाले, आपल्यातील संशोधक वृत्ती, शोधाची मानसिकता आपल्यातील अभियंत्याला जागे ठेवणार आहे. आपली मानसिकता आणि आपले व्यक्तिमत्व आपल्या करिअरची दिशा ठरवतात. त्यामुळे महाविद्यालायातील सर्व प्रकारच्या कार्यक्रमात स्वतःला आजमावून बघितले पाहिजे.

डांगे अभियांत्रिकी महाविद्यालायचे माजी विद्यार्थी आणि युतोपीआ ग्रुपचे डायरेक्टर सागर मोरे यांनी सचिव अँड. राजेंद्र डांगे कार्यकारी संचालक प्रो. आर. ए. कनाई यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अण्णासाहेब डांगे यांनी विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी कलागुणांना देखील आकार देण्याची गरज असल्याचे म्हटले. याचवेळी कला दालनाचे देखील अनावरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या साकारलेल्या १७ प्रकारच्या पुढाकारातून कलांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये विविध गुणदर्शन, नाटक, नृत्य, गाणी, कला प्रदर्शन, मिमिक्री, फॅशन शो, वक्तृत्व आणि पारितोषिक वितरण समारंभाचा समावेश होता. स्वागत, प्रास्ताविक रजिस्ट्रार डॉ. संतोष मोहिते यांनी केले.

कार्यक्रमाचा श्रीगणेशा आ. सत्यजित देशमुख, युतोपीआ ग्रुपचे डायरेक्टर सागर मोरे, संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे, सचिव अॅड. राजेंद्र डांगे, सहसचिव विश्वनाथ डांगे, कार्यकारी संचालक आर. ए. कनाई यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाला. संचालक डॉ. एल. वाय. वाघमोडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला.