गणरायाला निरोप देण्यासाठी वस्त्र नगरी सज्ज!

गेल्या दहा दिवसांपासून चैतन्यमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. घरगुती गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती व देखावे पाहण्यासाठी इचलकरंजी शहरात नागरिक गर्दी करत होते. शहर परिसरासह ग्रामीण तसेच सीमाभागातून नागरिक मोठ्या प्रमाणात येत होते. दहाव्या दिवशी रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी देखावे पाहण्यासाठी गर्दी केल्याने रस्ते गर्दीने अक्षरशः फुलून गेले होते.

आज मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबर पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. पारंपारिक विसर्जन मार्गासह शहापूर खण मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक, पोलीस अंमलदार, होमगार्ड, स्ट्रायकिंग फोर्स, राज्य राखीव दल, राखीव पोलीस दल अशा सुमारे 750 पोलिसांवर या बंदोबस्ताची जबाबदारी असणार आहे. तर सेक्टर पोलीसिंगच्या माध्यमातून सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्वांवर तीक्ष्ण नजर असणार आहे