मिरवणुकीत लेसर लाईट पडली महागात; गणेश मंडळांवर गुन्हे दाखल

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांत गणेशोत्सव मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर न करता डॉल्बीसारख्या कानठळ्या बसवणार्‍या आवाजात ध्वनीप्रदूषण करत मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत काही मंडळांनी डोळ्यांना इजा पोचवू शकणार्‍या लेझरचा वापर केला होता. पोलिसांनी दणदणाटमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, अशा केलेल्या आवाहनाला गणेशोत्सव मंडळांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीच्या दणदणाटात ध्वनीप्रदूषण करत मिरवणुका काढल्या आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट वापरास जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले होते. या निर्बंधांचे उल्लंघन करून अनेक मंडळांनी लेसर दिव्यांचा झगमगाट केला. पण हा झगमगट आता गणेश मंडळांना चांगलाच महागात पडला आहे.शहरातील नऊ गणेश मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व लेसर चालक अशा २९ जणांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.