आबा बापूंच्या प्रयत्नाने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर! लोणारी समाजाच्या वतीने आभार

सांगोला शहरांमध्ये लोणारी समाज रत्नपितामह विष्णुपंत दादरे यांच्या स्मारकाकरिता व लोणारी समाज सभागृह व अभ्यासिका याकरिता नगरपालिका हद्दीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावी याकरिता लोणारी समाजाच्या वतीने नुकतेच बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते.

या उपोषणादरम्यान समाजाच्यावतीने वरील मागण्या करण्यात आलेल्या होत्या. या मागण्यांची दखल प्रशासन व येथील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी घेऊन समाजास नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जागा उपलब्ध करून दिली आहे.

या जागेवरती भव्य सभागृह व अभ्यासिका बांधकामाकरिता तालुक्याचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित दादा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला व वरील कामाकरता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्हीही नेते मंडळींचे सांगोला तालुक्यासह समाजाच्या महाराष्ट्रातील लोणारी समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.