महाराष्ट्रातील तरुण मुले व्यसनाधीन होऊ नयेत, म्हणून सरकारने महाराष्ट्रात गुटखा बंदी केली. मात्र, गुटखाबंदीच्या निर्णयाने महाराष्ट्रात खरोखरच गुटखा बंद झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुटखाबंदी महाराष्ट्रात असली तरीही राज्याच्या कानाकोपऱ्यात गुटखा विक्री जोरात सुरु आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या संगनमताने शेजारील राज्यातून फार मोठया प्रमाणात गुटखा तस्करी करून हा गुटखा महाराष्ट्रात विकला जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सांगोल्यात खुलेआम गुटखा विक्री होताना दिसत आहे.
अन्न औषध अधिकाऱ्यांच्या हप्तेखोर कृतीमुळे सांगोला तालुक्यात खुलेआमगुटखा विक्री होत आहे. महाराष्ट्राच्या महसूल बुडाला असला तरीही अधिकान्यांची तिजोरी मात्र भरतच आहे. शेजारच्या राज्यातून गुटखा विक्रीचे रॅकेट अन्न औषध अधिकारीही सहभागी असल्याचे दिसत आहे. शेजारच्या राज्यातून गुटखा आणून महाराष्ट्रात चढ्या भावाने विक्री होत असल्यामुळे हा काळा बाजार फोफावला आहे. दररोज करोडोंची उलाढाल होते. शासनाने गुटखाबंदी केली असली तरीही याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळेच, हप्तेखोर अधिकाऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. गुटखाविक्रीला अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे अभय असून, दलालांच्या माध्यमातून या व्यवसायाला पाठबळ दिले जात आहे.
