इस्लामपुरात ओबीसी सेलची बैठक!असंघटित, अल्पसंख्याकांना संधी देण्याचे काँग्रेसचे धोरण

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मागासवर्गीय,
ओबीसी व अल्पसंख्याक यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अल्पसंख्याक लोकांना जास्तीत जास्त संधी देण्याचे धोरण काँग्रेस पक्षाने घेतले आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले. वाळवा तालुका कॉंग्रेस ओबीसी सेलच्या पदाधिकारी बैठकीत माळी बोलत होते. प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस

नंदकुमार कुंभार अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब खोत, विभागीय ओबीसी अध्यक्ष विवेक गुरव, विभागीय उपाध्यक्ष सलमाल आवटी यांची प्रमुख उपस्थिती होती. माळी म्हणाले, पंचायत समिती गटनिहाय ओबीसींच्या बैठकी घेऊन पक्षास बळकटी आणण्याचे काम चालू आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ताकद देऊ.

नंदकुमार कुंभार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी, अल्पसंख्याक, मागासवर्गीय काँग्रेसला ताकद देईल. स्थानिक स्वराज्य निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याने ओबीसी समाजाला निवडणुकीत संधी मिळणार आहे. संदीप परीट यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संदीप मोहिते, अजम मिस्त्री, सुहास पाटील, बाळासाहेब कांबळे, दीपक परीट, अशोक पवार, शिवाजी जावळे, विनय कांबळे, जगदीश माळी उपस्थित होते.