मित्रपक्षाने फसवल्याने शिवसेनेचा २०१९ला पराभव : भास्कर जाधव

शिवसेना-भाजपाची युती होती. तरीही २०१९ ला मित्रपक्षाने फसवले, आमच्या पक्षाचे आमदार पाडले. हातकणंगले राखीव मतदारसंघातून दोन वेळा आमदार झालेल्या डॉ. सुजित मिणचेकर यांचा पराभव मित्रपक्षानेच केला होता.यावेळी त्यांनी विधानसभेच्या मैदानात उतरावे, जनता त्यांच्या पाठीशी आहे. उद्धवसेनाही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे, असे आश्वासन आमदार भास्कर जाधव यांनी दिले. ते कुंथूगिरी येथे डॉ. सुजित मिणचेकर फौंडेशनच्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

कुंथूगिरी (आळते) येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये डॉ. मिणचेकर फौंडेशनच्या वतीने १६ प्राथमिक शिक्षक, १७ माध्यमिक शिक्षक आणि तीन जिल्हा परिषद शाळा व दोन हायस्कूल यांना आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ते म्हणाले, समाजामध्ये शिक्षकाचे स्थान फार मोठे आहे. त्यांचा सत्कार करणे क्रमप्राप्तच आहे. मिणचेकर फौंडेशनचे हे काम कौतुकास्पद आहे.

माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी फौंडेशनच्या कामाची माहिती दिली. गेली ११ वर्षे शिक्षक पुरस्कार वितरित करतो आहे. माझ्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत जनतेपुढे नतमस्तक होऊन विकासाची गंगोत्री मतदारसंघात आणली. पराभवाला कवटाळून बसलो नाही. जनतेच्या हितासाठी झटतच राहिल्याने जनतेच्या मनात घर केलेचे मत व्यक्त केले.