महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला एकतर्फी बहुमत दिलं आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला. विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री कोणा होणार, याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केल्याचं सांगण्यात येत आहे.
विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच मुंबईतील आमदारांना मंत्रिपदे देताना आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिली जाणार आहे.
याचदरम्यान काही संभाव्य नावे समोर आली आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता लागली आहे. मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांचं नाव मंत्रिपदासाठी पुन्हा एकदा चर्चेत आहे. यासोबतच प्रताप सरनाईक, भरत गोगावले, अतुल भातखळकर, प्रकाश सुर्वे, आशिष शेलार, गणेश नाईक यांचीही नावे सध्या मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. मुंबईतून मंत्रिपदे देताना ती मुख्यत्वे पुढील वर्षी होणारी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिली जातील.
या निवडणुकीत फायदा होईल, अशा चेहऱ्यांना मंत्रिपदे देण्याकडे प्रत्येक पक्षाच्या नेतृत्त्वाचा कल असेल, अशी चर्चा आहे. लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कामकाज पाहतील. दरम्यान, नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ठरवण्याच्या चर्चेची सूत्रे दिल्लीतून हलवली जात आहेत. एकनाथ शिंदे आणि सोबत अमित शहा हे आज रात्री चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.