चंद्रभागेच्या तीरावर महिलांसाठी 10 चेंजिंग रूम

कार्तिकी यात्रेच्या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येणार्‍या भाविकांना मंदिर समितीकडून मुबलक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.विठुरायाचे दर्शन घेण्यापूर्वी अनेक भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करतात. महिला भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंटात स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी 10 चेंजिंग रूमची उभारणी करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा होत आहे. त्याआधी वारकरी आणि भाविक श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल होत आहेत.

वारीला येणारे बहुतेक सर्व भाविक विठुरायाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करीत असतात. या ठिकाणी महिला भाविकांना कपडे बदलण्याची सोय करण्याच्या द़ृष्टीने चंद्रभागा नदीपात्रात 10 ठिकाणी चेंजिंग रूम बसविण्यात आलेल्या आहेत. याशिवाय महिलांच्या सुरक्षिततेच्या द़ृष्टीने चेजिंग रूमजवळ 24 तास महिला सुरक्षा कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या चेंजिंग रूमद्वारे एकावेळेस 30 ते 40 महिला भाविक कपडे बदलू शकतात.