Sangli: कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण, माजी खासदार संजय पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारास अर्ज भरण्यासाठी मदत करत आहे, या कारणावरून माजी उपनगराध्यक्ष अय्याज सय्यद मुल्ला यांना भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांच्यासह स्वीय सहायक खंडू होवाळे व आणखी पाच व्यक्तींवर शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात गुन्ह्य दाखल झाला आहे.कवठेमहांकाळ येथील दादा चौकातील मुल्ला यांच्या घरी ही मारहाणीची घटना शुक्रवारी सकाळी घडली. सदर घटनेची फिर्याद अय्याज मुल्ला यांनी पोलिसांना दिली आहे.

अय्याज मुल्ला यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली. या वेळी मुल्ला यांचा मुलगा कैफ, पुतण्या एजाज, अनिस आणि आई हाजराबी यांना ढकलून खाली पाडले. तू भविष्यात जिवंत कसा राहतो, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे मुल्ला यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसात माजी खासदार संजय पाटील व स्वीय सहायक होवाळ यांच्यावर कवठेमहांकाळ पोलिस स्टेशनमध्ये सायंकाळी गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर हे पुढील तपास करीत आहेत.