गेल्या ३५ वर्षांत इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील असमाधानकारक झालेला विकास व प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न यामुळे या मतदार संघातील जनतेच्या पदरी निराशाच आली आहे, ही परिस्थिती बदलायची असेल तर मतदारांनी या निवडणुकीत भाकरी पूर्ण करपून जाण्याआधी परतली पाहिजे आणि हीच ती संधी आहे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी मिरजवाडी व मौजे डिग्रज येथे विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी केले.
मिरजवाडी येथे १ कोटी ८ लाख व मौजे डिग्रज येथे ४५ लाखांच्या विकास कामांची उद्घाटन झाले. भोसले-पाटील म्हणाले, ‘सन २००९ पासून तुम्हाला जो ऊसतोडीचा, घराघरांत भांडणे लावण्याचा जो त्रास होतोय, त्याच एकच कारण आहे, ते म्हणजे अनेक वर्षे एकाच माणसाच्या हाती तुम्ही दिलेली सत्ता. त्यांचा एकाधिकारशाहीपणा सुरू आहे. ही ताकद कोठून आली, तर ती तुमच्या मतांमधून आली आहे. येथील सत्तेची व्यवस्था बदलायला हवी. त्यानंतर तुम्हाला नक्कीच बदल घडलेला दिसून येईल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला आशीर्वाद द्या.