‘बिग बॉस मराठी’च्या सर्वात जास्त गाजलेल्या या सीझन 5चा भव्यदिव्य बहुप्रतीक्षित ग्रँड फिनाले येत्या 6 ऑक्टोबरला दिमाखात पार पडणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनप्रमाणेच रितेश भाऊंनाही महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे.पाहता पाहता हा महाराष्ट्राचा नंबर वन नॉन फिक्शन शो ठरला. ‘बिग बॉस मराठी’ दररोज न चुकता पाहणं हा महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या दिनचर्येचा एक अविभाज्य भाग झाला आहे.
आज घरात काय घडणार? कोण कसा खेळ खेळतोय? कोण काय रणनीती आखतोय? कोणाचा प्रवास कधी संपणार? अशा अनेक चर्चा नेटकरी करताना दिसून येत आहेत. प्रेक्षकांच्या या कार्यक्रमाला आणि रितेश भाऊंच्या होस्टिंगला मिळत असलेल्या उत्स्फू्र्त प्रतिसादामुळे टीआरपीतही या कार्यक्रमाने घवघवीत यश मिळवले. पण टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक करणारा हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात ग्रँड फिनालेला सर्व सदस्य आता परस्परांमधली भांडणे विसरून बहारदार गाण्यांवर एकापेक्षा एक परफॉर्मन्स देणार आहेत.6 ऑक्टोबरला रविवारी, संध्याकाळी 6 वाजता, ‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनचा ग्रँड फिनाले जल्लोषात पार पडणार आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
6 ऑक्टोबरला या सीझनचा कोण विजेता होणार आणि ‘बिग बॉस मराठी’च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’ची सांगता होताच ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या सीझनचा धमाका सुरू होणार आहे.