इचलकरंजीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक! इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ…….

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींची लगबग सुरू आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहेत. कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याविषयीच्या चर्चा देखील रंगू लागलेल्या आहेत.

अशातच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात देखील चर्चांना उधाण आलेले आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ पूर्वापार काँग्रेसने लढवलेला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसच्या हक्काचा आहे. इचलकरंजीतून काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष संजय कांबळे यांचे नाव आघाडीवर आहे.

महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे राहिल्यास संजय कांबळे यांची उमेदवारी निश्चित आहे. यासाठी आमदार सतेज पाटील यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर शरद पवार गटाकडूनही दावा केला जात आहे यातून प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे आणि आमचा हा हक्क हिसकावून घेऊ नका असे म्हणत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून शिष्टमंडळाने राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आष्टा येथे भेट घेऊन इचलकरंजी मतदारसंघाची मागणी देखील केलेली आहे.

यावेळी प्रदेश सचिव शशांक बावचकर, राहुल खंजिरे, संजय कांबळे आदींसह कार्यकर्त्यांनी भेट घेऊन निवेदन दिले होते. तसेच शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळात मँचेस्टर आघाडीचे प्रकाश मोरबाळे यांच्यासह बजरंग दल, विश्वहिंदू परिषद, देवांग कोष्टी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश होता.