“मला भीती वाटतेय, निवडणूक काळात…”, संजय राऊत असं का म्हणाले?

महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी कितीही सभा घेतल्या, कितीही फिती कापाव्या, कितीही थापा माराव्यात. पण या राज्यातील जनतेने ठरवलेलं आहे की थापेबाजी बंद झाली पाहिजे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. यावरुन संजय राऊतांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त दिसतात. हरियाणा, जम्मू काश्मीरमधील निवडणूक ते हरतात. त्यानंतर महाराष्ट्र, झारखंड या निवडणुका होणार आहेत. हरियाणापेक्षा अधिक दणदणीत पराभव त्यांचा महाराष्ट्रात होणार आहे”, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.

“राज्यात काँग्रेसच जिंकणार. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी कितीही सभा घेतल्या, कितीही फिती कापाव्या, कितीही थापा माराव्यात. पण या राज्यातील जनतेने ठरवलेलं आहे की थापेबाजी बंद झाली पाहिजे. मला तर सतत भीती वाटते की निवडणूक काळात हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय? कारण हे दिल्लीत टिकतंच नाहीत”, असेही संजय राऊत म्हणाले.