संकरीत गायींची १५ ते २० दिवस वयाची सात वासरे व म्हशीचे एक रेडकू कत्तलीसाठी घेऊन जाताना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी अमीर मेहबूब मुलाणी (वय २३, रा. फलटण, जि. सातारा) याला अटक केली. सोमवारी रात्री १० वाजता विटा येथील मायाक्कानगर मधील म्हसोबाची ताल येथे ही कारवाई झाली. मुलाणी हा मोटारीतून (एम. एच. १४ एच ५४८२) जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार मायाक्कानगर येथे सापळा लावण्यात आला.
त्यावेळी मुलाणी हा मोटारीतून म्हसोबाची ताल येथे आला असता पोलिसांनी ताब्यात घेतले. गाडीची तपासणी केली असता सात वासरे व म्हशीचे रेडकू आढळले. ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.