विधानसभा २०२४ चा आमदार आटपाडीचा! ब्रह्मानंद पडळकर यांचा गौप्यस्फोट

विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत आटपाडीचाच आमदार झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही राजेंद्रअण्णांना तयार केले आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केला.

विशेष म्हणजे यावेळी खासदार संजय पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे चिरंजीव आणि आटपाडीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते.टेंभूच्या सहाव्या टप्प्याला मंजुरी मिळाल्याच्या आनंदप्रीत्यर्थ आटपाडीत खासदार संजय पाटील आणि हर्षवर्धन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत साखर वाटप करण्यात आले. यावेळी ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर- आटपाडीचे विद्यमान आमदार शिंदे गटाचे अनिल बाबर यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली.

ते म्हणाले, किती त्रास झाला, साखर कारखान्याचा विषय असेल, किंवा आणखीही बरेच विषय आहेत. आता ते येऊन सांगतील, युती आहे, ही शेवटची निवडणूक आहे, पण आपण ऐकणार नाही.आता आपण टेंभूच्या पाण्याची साखर वाटतोय, परंतु २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर साखर सुद्धा आपणच वाटायची आहे. आता मागे पुढे काही होणार नाही.

यावेळी आम्ही ठरवलं आहे, हे मी खासदार पाटील यांच्या माध्यमातून सांगतोय. आम्ही राजेंद्रअण्णांना तयार केले आहे, त्यांचीही तयारी आहे, असे सांगत हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे पाहून ते म्हणाले, तुम्हाला सांगतोय नाही तर रात्री जेवायला बसल्यावर नको, आपल्याला कशाला ? असलं काय म्हणत बसू नका. माझं जरा ऐका. त्यावर हसत हसत हर्षवर्धन देशमुख यांनी हातानेच असे काही होणार नाही, असे सांगितले.

पुढे पडळकर म्हणाले की, मी लहान कार्यकर्ता आहे, लईत लई काय होईल ? खासदार पाटील घरातलेच आहेत, मला आता गाडीत बसल्या वर बोलतील वाईट वंगाळ, ते काही जरी बोलले, तरी मी सहन करतो, पण यावेळी ठरवलंय आम्ही आटपाडीचाच आमदार करणार, त्यासाठी राजेंद्रअण्णांच आम्ही उभे करणार आहोत, असा पुनरुच्चारही ब्रह्मानंद पडळकर यांनी केला.