इस्लामपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राजारामबापू पाटील नाट्यगृहाचा प्रारंभीपासूनच दर्जा ढासळलेला आहे. नाट्यगृहाचे छत कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने रंगमंच कुलूपबंद आहे. नाट्यगृह नूतनीकरणासाठी नाट्यरसिकांनी नियोजन समिती स्थापन केली, परंतु तिचेही तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे नाट्यगृह केव्हा सुरू होणार यावर प्रश्नचिन्ह आहे.
तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने राजारामबापू पाटील नाट्यगृह नव्या कल्पनेतून उभे केले. याचे उद्घाटन दिवंगत अभिनेते राजेश खन्ना, नाना पाटेकर, पद्मिनी कोल्हापुरे, अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावर पालिका तिजोरीतून लाखो रुपये खर्ची पडले आहेत. परंतु पालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी नाट्यगृह कुलूपबंद झाले आहे. त्यामुळे नाट्यगृहातील अंतर्गत छत ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे. नूतनीकरण करण्यासाठी अंदाजे कोट्यवधी रुपये खर्च संबंधित विभागाने सुव्यवस्थेत नाट्यगृह पुन्हा आणण्यासाठी समिती नेमली.
परंतु समितीचीही पालिकेने दखल घेतली नाही. त्यामुळे नाट्यगृहात होणारे कार्यक्रम गेल्या महिनाभरापासून स्थगित झाले आहेत. प्रशासनाने यापूर्वी ३० ते ४० लाख रुपये खर्च करून साउंड सिस्टीमचा दर्जा सुधारला. परंतु आजही या सिस्टीमचा आवाज बसला आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात शालेय स्पर्धा, सेहसंमेलने आदी कार्यक्रमांनी रंगमंच फुलून जात होता. येणाऱ्या पाच ते सहा महिन्यांत दुरुस्ती होण्याचा मार्ग दिसत नाही. त्यामुळे नाट्यरसिक आणि विविध क्षेत्रांतील नाट्यरसिकांना कार्यक्रमांना मुकावे लागत आहे. सांस्कृतिक कलाकार, रसिक यांच्यातून संतापाची लाट उसळली आहे.
