राज्यातील मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येण्याची शक्यता असल्याने उमेदवार मानसिंगभाऊंना विजयी करून माझे हात बळकट करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी केले. रेठरे धरण (ता. वाळवा) येथे महाविकास आघाडीचे शिराळा मतदार संघातील उमेदवार मानसिंगभाऊ नाईक यांच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले, राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना पक्ष फोडण्याचे पाप भाजपने केले. राजकारण अत्यंत खालच्या थराला नेले. हा निष्ठावंत व लढणाऱ्या लोकांचा, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे.
येथील स्वाभिमानी जनतेने संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी सर्वसमावेशक विचार व विकास करणाऱ्या महाविकास आघाडीला साथ करेल. लोकसभा निवडणुकीत ते जनतेने दाखवून दिले आहे. माझ्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक-एक आमदार विजयी होणे महत्त्वाचे आहे. याचा विचार करून तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटण दाबून मानसिंगभाऊंना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आ. मानसिंगभाऊ म्हणाले, वाकुर्डे योजनेचे पाणी करमजाई तलावातून पहिल्यांदा वाळवा तालुक्यात रेठरे धरण येथे आणले. हा विभाग समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. २ हजार २७५ कोटी रुपयांचे विकासकामे राबवून मतदार संघाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. या केलेल्या कामाच्या जोरावर मतदान मागतोय.
विरोधी उमेदवाराचे विकासात योगदान नाही. त्यांनी स्व. शिवाजीराव देशमुखसाहेबांनी उभारलेला निनाई साखर कारखाना विकून त्यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. शिवतीर्थ दूध संघ बंद पाडला, देव माणसाचा मुलगा कर्तृत्वानं निघाला नाही. अशा मंडळींना नक्की मतदार खड्यासारखा बाजूला करा. विकासाची सुरू असलेली मालिका अखंड ठेवण्यासाठी मला पुन्हा मतदार संघाची सेवा करण्यासाठी विजयी करावे.