लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र दिसून आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात अनेक विविध चर्चाना उधाण आलेले आहे.
एकीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आपली भूमिका आजही गोपनीय ठेवली आहे. दुसरीकडे मात्र इस्लामपूर – शिराळा मतदारसंघातील त्यांच्याच समर्थकात वेगवेगळ्या चर्चे ला उधाण आले आहे. आ. जयंत पाटील यांनी भाजपमध्ये जावे असा मतप्रवाह काही गटांचा आहे तर काही गटांनी त्याच पक्षात आ. पाटील राहतील असा दावा केला आहे. परंतू सर्वच गट स्पष्टपणे भाष्य करीत नाहीत. विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची द्विधा अवस्था झाली आहे.
इस्लामपूर मतदारसंघात संपर्क दौरेही वाढले आहेत. विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थितीही दिसून येते. परंतू त्यांच्या भूमिकेविषयी कोणीच वक्तव्य करत नाहीत. त्यांना विचारण्याचे धाडसही समर्थकांत नाही. त्यामुळेच आ. पाटील यांची भूमिका आजही गुलदस्त्यात आहे. इस्लामपूर मतदारसंघात भाजपची ताकद असली तरी त्यांच्याकडे खमके नेतृत्व नाही. अशीच अवस्था काँग्रेस, शिवसेना, उबाठा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात दिसून येते. त्यामुळे आ. जयंत पाटील यांचेच नेतृत्व भक्कम आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहीले आहे. सध्यातरी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना समान अंतर दिले आहे. त्यामुळे आपली भूमिका स्पष्ट करण्याचा राजकीय डाव आखला जात आहे. यासाठी त्यांनी काही विश्वासू निष्ठावंत कार्यकत्यांशी बैठक घेवून चर्चा केली आहे.
परंतू आ. जयंत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी गोपनियता पाळली आहे. महिनाअखेर आपल्या भूमिकेचा स्फोट करतील, अशीच चर्चा त्यांच्या समर्थकांत आहे.वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे वार्षिक सभेची बैठक झाली. त्याअगोदर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक खा. शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खलबते झाली. याचवेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये आ. जयंत पाटीलही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आ. जयंत पाटील यांच्यातही चर्चा झाली. त्यामुळे महिनाअखेर राज्यात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये भुकंप होण्याचे संकेत आहेत. त्यावेळीच आ. जयंत पाटील यांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.