जयंत पाटील यांना घेरण्याचे विरोधकांबरोबरच मित्रपक्षांचेही प्रयत्न….

कृष्णा वारणेचे बारमाही पाणी, कसदार जमीन यामुळे सधन असलेल्या वाळवा तालुक्यातील राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याभोवतीच गेल्या साडेतीन दशकांपासून केंद्रित झाले आहे.मुख्यमंत्रिपद मिळविण्याची इच्छा त्यांनी कधीही लपवून ठेवलेली नाही. यामुळे मतदारसंघातील विजय आणि तोही मोठ्या फरकाने हवा आहे. तथापि, सर्वोच्च पदाच्या शर्यतीत असल्याने या वेळी त्यांना महायुतीतील विरोधकाबरोबरच स्वपक्षीय व मित्र पक्षातील विरोधकाशी सामना करावा लागणार आहे. यावेळी महाविकास आघाडीची उमेदवारी आमदार पाटील यांनाच मिळणार हे स्पष्ट असताना मित्रपक्षातील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

शिवसेनाकडून (ठाकरे) ताकदीने उमेदवारीची मागणी झालेली नाही. मात्र, महायुतीत उमेदवारीसाठीचा संघर्ष अधिक तीव्र स्वरुपात होताना दिसतो आहे. महायुतीतून भाजपकडून माजी नगराध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील यांची प्रबळ दावेदारी असली तरी राहुल महाडिक, विक्रम पाटील आदींनीही उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. तसेच महायुतीतील शिवसेना (शिंदे) गटाकडूनही उमेदवारीसाठी आग्रह धरला जात असून जागा वाटपात ही जागा कोणाच्या पदरी पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेना (शिंदे) पक्षाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, हुतात्मा उद्योग समूहाचे गौरव नायकवडी हे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाकडून उमेदवारीसाठी फारसा आग्रह दिसत नसला तरी महायुतीत अन्य दोन पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहण्यास मिळत आहे.