इचलकरंजी, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अटी शर्तीवर शहरातील काही इच्छुक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. दसऱ्याच्या मूहर्तावर हा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. या इच्छुकांची महानगरपालिकेची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यामुळे भाजपला बळ मिळणार असले तरी उमेदवारी देताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापत आहे. महाविकास आघाडी एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे तर दुसऱ्या बाजूला शहरातील अनेक इच्छुक भाजपच्या वाटेवर आहेत.
सध्या भाजपकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक आकर्षित झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर पक्षामध्येही पूर्वीपासून काम करणारे अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्ते आहेत. महानगरपालिकेची उमेदवारी देताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यावेळी नाराजी ओढवून घेण्याचा प्रसंगही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेतात हे लवकरच समजणार आहे.
त्यांना पक्षांमध्ये प्रवेश देवून उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यांना पक्षात घेतल्यानंतर पक्षाला किती फायदा होणार आहे. याचीही आकडेमोड सुरू करण्यात आली आहे.महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचे वक्तव्य पहिल्यापासूनच हाळवणकर- आवाडे करीत आहेत. जर महापालिकेवर सत्ता आणायची असेल तर मोठी मोट बांधली पाहिजे यासाठी विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षापासून दूर गेलेल्या नेत्यांनाही सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.त्यातील काहींची उमेदवारी ही निश्चित मानली जात आहे. मात्र त्यांना पक्षात घेताना काही अटी व शर्ती घालण्यात येणार असल्याचे समजते.
