उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूरमध्ये पुन्हा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे विधानसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदरच अजितदादांना सोलापूरमध्ये पुन्हा एकदा धक्का बसला आहे. साळुंखे यांच्या राजीनामामुळे ते अपक्ष लढणार की ‘मशाल’ हाती घेणार? याबाबत तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.
दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन विधानसभेची आगामी निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. सांगोल्यात मी शेतकरी कामगार पक्ष आणि आमदार शहाजी पाटील यांना मदत केली आहे, त्यामुळे त्यांनी आता आपल्याला संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
माजी आमदार दीपक साळुंखे यांनी सांगोल्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन जनता हाच माझा पक्ष आहे. तालुक्यातील जनतेने मला तुम्ही निवडणुकीत उभे राहण्यास सांगितले आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी मी उमेदवार असणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा देत असल्याचे दीपक साळुंखे यांनी सांगितले.