निवडणुका लढवणारे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी निवडणूक आयोगानं एक आदर्श आचारसंहिता घालून दिली आहे. या आचारसंहितेचं पालन करणे या सर्वांसाठी बंधनकारक असतं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे. आचारसंहितेचं मॅन्युएल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आलेलं आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांवर काय कारवाई होते, हेही त्यात सांगण्यात आलं आहे.
मतदारांना पैसे वाटणे, महागड्या भेटवस्तू देणे, आमिष दाखवणे, या सर्व प्रकारांना सक्त मनाई असते. या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकासकामांची घोषणा करता येत नाही. सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या मंत्र्याला किंवा नेत्यांना रस्ते, पाणी, वीज अशी आश्वासने देता येत नाहीत. निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही. मतदारांना धमक्या देणं, दबाव आणणं हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय सभा किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते. आचारसंहिता काळात विरोधकांचा निषेध नोंदवणंही नियमबाह्य ठरविण्यात आलं आहे.