इचलकरंजी शहराला विकास कामांसाठी साडेदहा कोटी रुपयांचा निधी मंजूर

इचलकरंजी शहराला विशेष निधीतून विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यासाठी शासन दरबारी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांचे प्रयत्न चालू होते. त्या प्रयत्नांना यश आले असून निधी मंजुरीचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला असल्याचे माने यांनी सांगितले. इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत साडेदहा कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धैर्यशील माने यांचे या कामी सहकार्य लाभले असल्याचे देखील माने यांनी सांगितले. या निधीतून कॉ. के. एल. मलाबदे चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी एक कोटी रुपये तर जगतज्योती बसवेश्वर महाराज परिसर विकसित करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

तर आठ कोटी रुपयांचा निधी श्रीमंत घोरपडे नाट्यगृह सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात येणार आहे. त्याशिवाय शहरांमधील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उर्वरित निधी खर्च करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.