आष्ट्यामध्ये पाटील – शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव….

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रेचा समारोप इस्लामपूर येथे आज बुधवारी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी आष्टा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील आष्टा येथे आले होते. या निमित्ताने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक देखील बोलवण्यात आलेली होती. या बैठकीत वैभव शिंदे यांनी इशारा दिला.

शिंदे म्हणाले लोकसभा निवडणूक बॅनरवर, राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातील बॅनरवर, दसरा महोत्सव कार्यक्रमातील डिजिटल वर विलासराव शिंदे यांचा फोटो घातला नाही. कल्पना देऊन सुद्धा वेळोवेळी विलासराव शिंदे यांचा फोटो वगळण्यात आला आहे. इतके दिवस गप्प होतो पण आता कार्यकर्ते संतापले आहेत. ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत वेगळा विचार करावा लागेल. आम्ही कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आमदार जयंत पाटील यांचा फोटो वगळलेला नाही.

यावेळी शिंदे व पाटील गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर जयंत पाटील गटातील पदाधिकाऱ्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. या पुढील काळात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. आता दिलेले आश्वासन किती दिवस चालते हे पाहू असा सूरही उपस्थितानमध्ये होता.