सांगोल्यावर ठाकरेंचा दावा! मा. आम. दिपक साळुंखे पाटील यांचे नाव चर्चेत

सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही रस्सीखेच दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सर्वात जास्त वाईट अवस्था असून त्यांचा गेल्यावेळी केवळ सांगोल्यातील एकमेव आमदार विजयी झाला होता. सांगोल्यात जिंकलेले आमदार शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदेंची साथ देत उद्धव ठाकरेंना सोडचिट्टी दिली होती. आता उद्धव ठाकरेंनी सांगोल्याची जागा मागितली असून त्यांच्या वाट्याला फक्त बार्शी ही एकमेव जागा येत होती.सांगोल्यातूनच घटक पक्षातील शेतकरी कामगार पक्षाचा वर्षानुवर्षाचा दावा असून येथून शेकापचे स्वर्गीय गणपतराव देशमुख हे तब्बल 55 वर्षे आमदार होते.

ही जागा शरद पवार यांना गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी शेतकरी कामगार पक्षाला सोडायची आहे. मात्र आता या जागेसाठी उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून सांगोल्याला गेल्या वेळी आमदार शिवसेनेचा असल्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे या भूमिकेवर ठाम आहे. या जागेसाठी अजित पवार गटाला सोडचिट्टी दिलेले माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचे नाव चर्चेत असून ही जागा शिवसेना घेण्यासाठी आग्रही आहे.