सांगोल्यातून शहाजीबापू पाटलांची तुफानी टोलेबाजी! तर मतदारसंघात केलं विशाल शक्ती प्रदर्शन

निवडणुकीच्या शंखनादानंतर आता नेते ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. काही मतदारसंघात मित्रपक्षांचा विद्यमान आमदारासोबतच मित्रपक्षातील नेते देखील उमेदवारी मागू लागल्याने आता खडाजंगी होऊ लागली आहे.अशातच एका बाजूला शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार शहाजीबापू यांचे मित्र महायुती सोडून मशाल हाती घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बापू यंदा निवडणूक रिंगणातून माघार घेणार अशी टीका शरद पवार गटाचे दुसरे मित्र करीत असताना बापूनी सांगोल्यात युवक मेळावा घेत विशाल शक्ती प्रदर्शन करून विरोधकांवर तुफानी टोलेबाजी केली.

आपल्या खुमासदार भाषणात संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यासह शेकापच्या नेत्यांवर बापूंनी तोफ डागली. शहाजीबापू यांची सांगोला शहराच्या प्रवेशद्वार पासून युवकांकडून भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. ठिकठिकाणी जेसीबीने फुलांची उधळण करीत आणि हलग्यांच्या कडकडाटात बापुंना वाजत गाजत युवक मेळाव्याच्या ठिकाणी आणण्यात आले. यावेळी प्रचंड गर्दी होती. शहरात ठिकठिकाणी बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर मेळाव्यात बापूंनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करण्यास सुरुवात केल्यावर युवकांचा तुफानी प्रतिसाद पाहता बापूंची आजही तरुणात मोठी क्रेझ असल्याचे दिसून आले. मी 95 वर्षे जगलेल्या गणपतराव देशमुख यांच्या विरोधात 7 निवडणूक लाढलोय त्यामुळे माझी अजून 35 वर्षे शिल्लक आहेत असा टोला विरोधकांना लगावला .