राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला आहे. त्यानुसार रणधुमाळीला म्हणजेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पुढच्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. अद्याप महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागावाटप निश्चित झाले नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक मतदारसंघातील उमेदवार निश्चित होणे बाकी आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघावर शिवसेना व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने तर मिरज विधानसभा मतदारसंघावर तिन्ही पक्षाने दवा सांगितला आहे.
त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाचा फैसला अद्याप झालेला नाही. तर दुसरीकडे महायुतीमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. महायुतीमध्ये मिरज, सांगली, पलूस कडेगाव, तासगाव कवठेमंकाळ, जत हे मतदारसंघ भाजपाला मिळाले आहेत. तर खानापूर आटपाडी शिंदे गटाला मिळालेला आहे. खानापूर आटपाडी महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना यांना मिळाली असून सुहास बाबर यांची उमेदवारी निश्चित आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागावाटप व उमेदवार अद्याप ठरलेला नाही. या ठिकाणी ठाकरे गट व शरद पवार गट जागेची मागणी करत आहेत. पण वैभव पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख हे शरद पवार पक्षाकडून लढण्यास इच्छुक आहेत. आता इच्छुक उमेदवारांचे लक्ष जागावाटप व पक्षाच्या उमेदवारी यादीकडे लागलेले आहे.