सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. उमेदवारीचे अर्ज प्रत्येक मतदारसंघांमध्ये भरण्याची चढाओढ सुरू झालेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंपदा मंत्री, सहकार मंत्री, विधान परिषदेचे सभापतीपद यांसारखी अनेक महत्त्वाची खाती सांभाळण्याची संधी सांगली जिल्ह्यातील विविध मतदारसंघाला मिळाली. मात्र यात जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ 1962 च्या स्थापनेपासून मंत्रीपदापासून वंचित कायम आहे.
मतदारसंघात चार वेळा आमदारकी भूषविलेल्या अनिलराव बाबर यांना मंत्रिपदाची सर्वाधिक संधी होती. मात्र राजकारणाला कलाटणी मिळून महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यानंतर महायुतीच्या सत्तेतही त्यांना मंत्रीपदापासून वंचित रहावे लागले. विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही मंत्री पद मिळालेले नाही. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा मंत्रीपदाचा दुष्काळ 2024 च्या या विधानसभा निवडणुकीनंतर संपणार का? याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिलेले आहे.