इचलकरंजी शहरास कृष्णा नळपाणी पुरवठा योजना आणि पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो. कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेला गळती लागल्यानंतर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होतो. सध्या शहरात तीन चार दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो. नागरिकांना इतरत्र आधार घ्यावा लागतो. ऐन पावळ्यात पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. त्यामध्ये शिरढोण येथील बाणदार हायस्कूलजवळ गळती लागल्याने पुन्हा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.
इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या जुन्या पाण्याच्या दाब नलिकेस शिरढोण बाणदार हायस्कुलजवळ गळती लागली. यामुळे शहरास होत असलेला पाणी पुरवठा दुपारी १२ वाजलेपासून तातडीने बंद करणेत आलेला आहे. सदर ठिकाणची गळती काढणेचे काम महानगरपालिकेच्या वतीने तातडीने हाती घेणेत आल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडीत होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना अपुरा पाणीपुरवठा होणार आहे.
सदर पाइपलाईनची गळती काढणेचे काम पुर्ण होताच शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करणेत येईल. तरी शहरातील नागरिकांनी आपल्या जवळचा उपलब्ध पाणीसाठा जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.