शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल, सामूहिक शेतीला प्राधान्य

आटपाडी तालुक्यामधील लिंगीवरे, पुजारवाडी, राजेवाडी, पांढरेवाडी, भवानी मळा, घनचकर मळा, तरटी मळा, नळमळा, ढोलेमळा, दिघंची यासह अनेक भागातील गावच्या शिवारामध्ये शेतकऱ्यांचा कल हा ऊस लागवडीकडे वाढत चाललेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी लागवड ही जास्त झालेली पाहायला मिळत आहे. यंदा राजेवाडीचा तलाव हा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तसेच मानगंगा नदी प्रवाहित तसेच तलावापासून सर्व बंधारे पाण्याने भरल्याने सिंचना बरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटलेला आहे. त्यामुळे शेतकरी ऊस लागवडीकडे वळलेला आहे. तसेच ऊस पिकांबरोबरच काही शेतकरी हे ढोबळी मिरची सह अन्य भाजीपाला लागवड करत आहेत. या भागातील शेतकरी उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा पुरेपूर उपयोग करून घेतानाचे चित्र सध्या दिसत आहे. शेतकऱ्यांचा उसाचा वाढता कल बघता उसाच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे.